शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा, आरोग्य शिबीर व विविध स्तोत्रांचे जागतिक विक्रम

मोशी  :  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, पुणे येथे महासत्संग मेळावा, ११ लाख भाविकांच्या उपस्थितीत संप्पन होत आहे. या महासत्संग मेळाव्यात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मध्ये विवाह संस्कार विभागांतर्गत सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा तसेच जवळपास ५००० विवाह निश्चितीचे उद्दिष्ट आहे. स्वयंरोजगार विभागा अंतर्गत महारोजगार मेळाव्यात परिसरातील ३५० पेक्षा अधिक देशी व विदेशी कंपन्यांमध्ये ११००० जागा महाभरतीचे उद्दिष्ट आहे. उद्योजक विकास धोरण अंतर्गत ११००० पेक्षा जास्त युवक युवतींना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच विविध उद्योगांचे ५०० हुन अधिक स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. राष्ट्रकल्याणाकरीता सव्वा कोटी श्री गणपती अथर्वशीर्ष आवर्तन तसेच श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, जगत् गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग व पसायदान पठण होणार आहे. विविध आजारांच्या २०० तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सेवामग्न आहे. नाशिक शहरापासुन जवळ दिंडोरीहुन गेल्या सात दशकांपासून सामाजिक सुधारणेसाठी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग निरंतर सर्व सामन्यांच्या उध्दारासाठी कार्यरत आहे. व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, बिना-हुंडा सामूहिक विवाह, कृषि विकास, सांप्रदायिक सद्भाव, बालसंस्कार अश्या विविध विनामूल्य उपक्रमांसह दिंडोरी येथून सुरु झालेला सामाजिक विकासाचा हा राजमार्ग आता हजारों सेवाकेन्द्रांच्या माध्यमातुन विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परंपरा आणि संस्कृतिचा गौरव संपूर्ण विश्वात प्रसारित करत आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आज सेवामार्गाचे सुमारे ७००० हुन अधिक सेवाकेंद्र भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तरप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडु, केरळ, असे विविध राज्य आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, यूरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, ओमान, अश्या विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.

सेवामार्गाचे सर्व कार्यक्रम लाखो निःस्वार्थ आणि समर्पित स्वयंसेवक सेवेकऱ्याद्वारे विनामूल्य आणि नियमितपणे चालवले जातात आणि मुख्य म्हणजे या सर्व स्वयंसेवक सेवेक-यांनी स्वतः या विविध कार्यक्रमांचा अनुभव आणि लाभ घेतला आहे आणि ते या सेवा जात, पात किंवा धर्म विचारात न घेता, कोणताही भेदभाव न करता समाजातील सर्वात खालच्या स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत आहेत, हे सर्व परमपूज्य गुरुमाऊलींच्या सक्षम मार्गदर्शन आणि निस्वार्थ प्रेमामुळेच शक्य आहे. या सर्व कार्यक्रमांचा आणि प्रशिक्षणांचा उद्देश पुढची अशी पिढी निर्माण करणे कि ज्यांना आपल्या संस्कृतीवर गर्व आहे, दृष्टी विज्ञानिक आहे, आणि भविष्याचा सामना करण्यासाठी मन- बुद्धी तयार आहे.

परमपूज्य गुरुमाऊली गेली ४५ वर्षे “ग्राम आणि नागरी विकास अभियान” च्या माध्यमातून समाजातील दुःखी पिडीत लोकांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांना सक्षम आणि स्वावलंबी.बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. ग्राम आणि नागरी विकास अभियानात १८ विभागाच्या द्वारे ज्यात गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, कृषी, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान, पर्यावरण, दुर्ग संवर्धन, पशु व गौवंश संवर्धन, स्वयंरोजगार, भारतीय संस्कृती, कायदा जागरूकता, आरोग्य आणि आयुर्वेद, आयटी विभाग, प्रशिक्षण विभाग, देश विदेश अभियान विभाग, आणि प्रशासकीय विभाग यांचा समावेश आहे.

या सर्व उपक्रमांचा परिणाम म्हणून आज लाखो लोक व्यसनमुक्त, निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत. परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातील सेवेकरी तरुणांना करिअर समुपदेशन करणे, स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करणे, महिलांसाठी बचत गटांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार शिबिरे आयोजित करणे, आशा सेवक आणि मातांसाठी शिशु संस्कार प्रशिक्षण देणे, पालकांसाठी पालकत्व मार्गदर्शन, शिक्षक मांदियाळी, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, शेतक- यांसाठी बांधावर जाऊन विविध मार्गदर्शन, वृक्ष लागवड व संवर्धन, दुर्ग संवर्धन, नदी स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, अन्नदान, वस्त्रदान, आरोग्य शिबिरे, दुष्काळ व पूरस्थितीत मदत कार्य, प्रत्येक वर्षी १ कोटी वृक्ष लागवड, सेंद्रिय नैसर्गिक आणि आध्यात्मिक शेती मार्गदर्शन, सामूहिक विवाह समारंभ, रोगनिदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन, आदिवासी व अतिमागास भागात चालते फिरते रुग्णालय व एम्बुलंस, आदी विविध सामाजिक उपक्रम सतत राबवत असतात.

कोविड महामारी दरम्यान चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचंड नकारात्मक परिणाम होत राहिला. एकटेपणामुळे मुले, प्रौढ आणि वृद्धांसाठी वेदनादायक स्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली महामारीमुळे उद्भवलेल्या मानसिक असंतुलनावर मात करण्यासाठी मंत्रक्रिया ध्यान योग हे विशिष्ट ध्यान तंत्र तसेच विविध दैनिक सेवा डिजिटल माध्यमाद्वारे भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई सह विविध देशात उपलब्ध करून देण्यात आल्या. हा उपक्रम अनेकांना मानसिक समस्या आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरला.

परमपूज्य गुरुमाऊली यांच्या सामाजिक क्रांती मोहिमेचा विस्तार म्हणून, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे मल्टी स्पेशालिटी सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या रूपाने उचललेले एक पाऊल येत्या काही दशकात एक मोठी उपलब्धी ठरणार आहे. सर्वांसाठी कमी खर्चात वैद्यकीय उपचार आणि निरोगी जीवन जगण्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे.

परमपुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ फेब्रुवारी ला PIECC ग्राउंड मोशी, पुणे येथे महासत्संग मेळावा संप्पन होत आहे. या महासत्संगात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नामांकित कंपन्या मध्ये चांगल्या पगाराच्या सुमारे अकरा हजार जागांसाठी नोकर भरतीचे आयोजन विनामूल्य पद्धतीने केलेले आहे. त्या सोबतच विवाह संस्कार विभाग अंतर्गत सर्व जाती धर्मीय वधू-वर विवाह नाव नोंदणी व मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विनामूल्य विवाह इच्छुकांची नावनोंदणी करुन साठ हजारहून अधिक स्थळांची माहिती उपलब्ध करुन पाच.

हजार विवाह जमवण्यात येणार आहेत. सोबतच भव्य आरोग्य शिबिर दोनशे पेक्षा अधिक नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले आहे.

 श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणे याचे मार्गदर्शक श्री. सतिषदादा मोटे यांनी सांगितले की, या महासत्संग सोहळ्यास अकरा लाख भाविक, स्वामीभक्त, सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. १५० एकर परिसरात बसेस, कार, मोटर सायकल पार्किंग व्यवस्था, ५० एकर परिसरात भव्य स्टेज व बैठक व्यवस्था, ११ लाख भाविक सेवेकऱ्यांना मोफत अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप असे नियोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महासत्संग मेळाव्यात विश्वविक्रमी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, सव्वा कोटी श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, श्री तुकारामांचे अभंग पठण व पसायदान पठण असे बहुविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

 या महासत्संग सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सर्व धर्म व पंथाचे धर्मगुरू, शासकीय अधिकारी, समाजसेवक, पत्रकार, नामवंत डॉक्टर व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या अद्वितीय सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणे तर्फे करण्यात आले आहे.

Recent Post

× How can I help you?