पिंपरी, ०८ फेब्रुवारी २०२३: पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक कंपन्यासाठी महापालिकेमार्फत “कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट” (CETP) उभारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते भोसरी एमआयडीसी येथील प्लॉट क्र. १८८/१ येथे मंगळवारी दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवडचा औद्योगिक पट्टा महाराष्ट्र आणि भारतातील एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात ४ हजारहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सुमारे १ हजार औद्योगिक युनिट्स घातक सांडपाणी आणि कचरा निर्माण करतात. या युनिट्समध्ये धोकादायक सांडपाणी, कचऱ्याची कायदेशीर आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा नाही. या परिस्थितीमुळे माती आणि जल प्रदूषण होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MCCIA) गेल्या काही दशकांपासून पाठपुरावा करत असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CETP) स्थापनेबाबतची मागणी करण्यात येत होती.
औद्योगिक घटकांची गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी, एमपीसीबी (MPCB) आणि उद्योग संघटना यांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये, PCMC अंतर्गत येत असलेल्या MIDC भागात कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, MIDC मार्फत सुमारे 1.5 एकरचा भूखंड (प्लॉट क्र. T-188/1, MIDC, भोसरी) नाममात्र दराने उपलब्ध करून देण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड आणि ऑरेंज श्रेणीतील औद्योगिक युनिट्सचा संमती डेटा प्रदान केला आहे.
प्रस्तावित CETP च्या जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग (IAS) यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडणार असून या कार्यक्रमाला शंकर वाघमारे (प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), एम.एस. कलकुटकी (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, चिंचवड), दीपक करंदीकर (अध्यक्ष, एमसीसीआयए), प्रशांत गिरबाने (महासंचालक, एमसीसीआयए), सतीश बनवट (अध्यक्ष, मेटल फिनिशर्स असोसिएशन ऑफ पुणे). ), संजीव शहा (अध्यक्ष, PCMC CETP फाउंडेशन) आणि स्थानिक उद्योग संघटनांचे अधिकारी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
सदर प्रकल्पाचा DPR तयार करण्याचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू झाले असून 3 ते 4 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सांडपाणी निर्मितीचे प्रमाण लक्षात घेता सुमारे 1 MLD च्या प्लांटची आवश्यकता यासाठी असणार आहे. तथापि, तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर अंतिम क्षमतेचा निर्णय घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका एकूण प्रकल्प खर्चाच्या ६५ % भार उचलणार असून MIDC आणि MPCB प्रकल्प खर्चामध्ये अनुक्रमे २० % आणि 5% योगदान देतील. तसेच, औद्योगिक युनिट्स प्रकल्प खर्चाच्या उर्वरित १०% योगदान देतील. औद्योगिक घटकांमधून टँकरमध्ये सांडपाणी गोळा केले जाईल. सांडपाणी निर्माण करणाऱ्या औद्योगिक घटकांना CETP चे सदस्य होणे बंधनकारण असणार आहे. त्यासाठी MCCIA हे CETP स्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि रचनात्मक सहाय्य करीत आहे. CETP एकदा कार्यान्वित झाल्यानंतर माती आणि नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे.