कोळथरे हे दापोली तालुक्यातील समुद्र किनारी वसलेले एक सुंदर खेडेगाव आहे .गावाला स्वच्छ सुंदर असा छोटासा समुद्र किनारा लाभलेला आहे . गावातील आई आ.गो.म.विद्यामंदिर कोळथरे आणि ग्रामस्थ मिळून दरवर्षी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवतात. सुमारे 20 वर्षा पूर्वी कोळथरे येथील अगोमचे महाजन, ग्रामस्थ आणि सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांनी कोळथरे समुद्र किनारी कासव संवर्धन मोहीम राबविण्यास सुरवात केली.
गेली काही वर्षे महाराष्ट्र शासनाने या मोहिमीचे महत्व लक्षात घेऊन वनविभागाच्या मार्फत कासव संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे .वनरक्षक श्री सूरज दिलीप जगताप, वनपाल – श्री सा.स .सावंत ,वनपरिक्षेत्र अधिकारी – श्री वैभव बोराटे ,
विभागीय वनअधिकारी -श्री दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील श्री प्रवीण तोडणकर आणि श्री. तेजस तोडणकर हे काम मोठ्या आस्थेने हे काम करत आहेत. वेळास ,केळशी ,आंजर्ले ,दाभोळ अश्या विविध समुद्र किनारी हा प्रकल्प राबविला जातो.
समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी थंडीच्या दिवसात या समुद्र किनारी येत असतात .कासवांची अंडी हॅचरीमध्ये संरक्षित करून ठेवली जातात .साधारणपणे 55 ते 65 दिवसात या अंड्यामधून कासवांची पिल्ले बाहेर येतात ,ही पिल्ले काळजी पूर्वक त्यांच्या नैसर्गिक रहिवासात म्हणजेच समुद्राच्या पाण्यात सोडली जातात .
या वर्षीही कोळथरे समुद्र किनाऱ्यावर सर्वाधिक 34 घरटी संरक्षित करण्यात आलेली आहेत यामध्ये एकूण 3450 अंडी असून लवकरच अंडी उबून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात होणार आहे .
घरटी येण्याचा कालावधीत अधिकाधिक घरटी ज्यावेळी येतात त्यामधील पिल्ले बाहेर येण्याचा अंदाज घेऊन कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते .कासवांची पिटुकली पिल्ले समुद्रात जातानाचे ते अनुपम दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी अनेक निसर्ग प्रेमी या कालावधीत कोळथरे समुद्र किनारी आवर्जून येत असतात .या वर्षी 10 मार्च ते 30 मार्च या दरम्यान मोठ्या संख्येने पिल्ले येण्याची शक्यता आहे .पिल्ले बाहेर येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने त्याचा अचूक अंदाज बांधता येत नाही म्हणून अधिकाधिक घरटी आल्याचा कालावधी गृहीत धरून हा कालावधी कासव महोत्सवासाठी निश्चित करण्यात येतो अशी माहिती कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री दीपक महाजन यांनी दिली आहे.