आजच्या काळात आपल्या सर्वांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झालेली असताना, जिज्ञासा जागृत झाली तर ज्ञानाकडे ओढ निर्माण होऊ शकते, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. रविवारी पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात, ‘बा भीमा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कॉमिकच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
पुण्याच्या उरुवेला प्रकाशनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कॉमिक्स मालिकेचे प्रकाशन केले आहे. त्याच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनादरम्यान कॉमिक हे कथा सांगण्याचे उत्तम माध्यम आहे, या अनुषंगाने बोलताना आंबेडकर म्हणाले,”आजचा काळ मोबाईलचा आहे. आपण सर्वच अंगठ्याने मोबाईलच्या स्क्रीनवर मजकूर पुढे ढकलत असतो. त्यामुळे आपली लक्ष देण्याची क्षमता कमी झालेली आहे. अशात जिज्ञासा निर्माण झाली तर आपल्याला ज्ञानाची ओढ लागू शकते, त्यामुळे या स्वरूपाचा प्रयत्न त्यासाठी उपयोगाचा आहे.”
त्याचसोबत त्यांनी असेही म्हटले की आज कोणालाही निर्णय घ्यायला आवडत नाही. “निर्णय घ्यायचा म्हणजे निर्णयांच्या परिणामांची जवाबदारी घ्यायला हवी. त्यामुळे ती जवाबदारी नको म्हणून मी निर्णयच घेणार नाही, असे लोक वागतात,” असे ऍड. आंबेडकर म्हणाले. त्यांनी प्रकाशकांचे कौतुक करत पुढे म्हटले की, “या निर्मितीमध्ये एक दिशा आहे. काही पाने मला वाचता आली त्यातूनही हे लक्षात येत आहे की यातील वाक्यांना एक दिशा आहे. त्यामुळे ही एक उत्तम निर्मिती आहे.”
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले युवा उद्योजक गौरव सोमवंशी म्हणाले, “सर्वात अवघड काम असतं, अवघड गोष्ट सोपी करून सांगणं. ते जमण्यासाठी जिनियस असावं लागतं आणि ही निर्मिती त्यामुळेच जिनियस आहे. चित्रभाषेतून सांगितलेली कथा वाचायला आणि समजायला सोपी जाते, त्यातून वैचारिक जडणघडण होते. अनेकदा आपण जे शिकलेलो असतो, ते विसरने कठीण असते. मात्र या कॉमिकच्या निमित्ताने आपण जुने विचार विसरून नव्याने शिकण्यास सुरुवात केली पाहिजे.”
कार्यक्रमाला लाभलेले दुसरे पाहुणे कलाकार डॉ. सुनील अवचर यावेळेस बोलताना म्हणाले, “या महाराष्ट्राला चित्रभाषेतून कथा सांगण्याची मोठी परंपरा लाभलेली आहे, ज्याचा पुरावा म्हणजे अजिंठा लेण्यांमधली चित्ररूपातील कलाकुसर. या पुस्तकाचा प्रयत्न थेट अजिंठ्याशी आपली नाळ जोडतोय कारण तो आजच्या काळातली चित्रभाषा वापरून आपल्या कथा पोहोचवतोय.”
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सुजत आंबेड्करदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले.
सुरज वाघमारे व गीता वाघमारे यांनी ‘बा भीमा’चे प्रकाशन केले आहे, तर मुख्य लेखन राहुल पगारे, सहलेखन सिद्धांत बोकेफोडे यांनी केले आहे. संपादकीय मंडळात आशिष शिंदे, राहुल पगारे आणि प्रथमेश पाटील यांचा सहभाग आहे. दरम्यान, या कॉमिकच्या लेखनाचा अनुभव सांगताना लेखक राहुल पगारे म्हणाले, “मी लहान मुलांसाठीची साहित्य शोधत असताना मला बहुजन नायकांची गोष्ट सांगणारे, त्यांचे विचार मांडणारे साहित्य सापडले नाही. ही एक मोठी पोकळी मराठी बाल साहित्यात आहे. ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवा म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला.