पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित,
पुणे, दि. 18 मे 2023: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. 18) रात्री 7.10 वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे 3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. रात्री 2.00 नंतर या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु होण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएल शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये आज रात्री 7.10 वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही चाकण, 220 केव्ही चिंचवड, 220 केव्ही उर्से, 220 केव्ही चाकण, 132 केव्ही चाकण, 132 केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. यात सुमारे 396 मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे 1लाख 25 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
सोबतच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील 50 टक्के परिसरातील 2 लाख 30 हजार असे एकूण 3 लाख 55 हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे 5 हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर 132 केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे.