कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकराजे शाहू महाराज हे माणूस म्हणून फक्त माणसांसाठी जगले. त्यांनी कधीही जात आणि धर्माला महत्त्व दिले नाही. सतत सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी जगात प्रथम न मागता आरक्षण दिलं. पाण्यासाठी धरण बांधले. कला आणि कुस्तीला मदत केली. आपल्या राज्यातील महिलांना अधिकार दिले. आपली रयत शिकावी म्हणून खास प्रयत्न केले. आपल्या राज्यात गरीब माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. राजर्षी शाहू हे एक दीपस्तंभ होते. ज्ञानवंत होते. मानवतावादी भूमिका घेऊन जगणारे महामानव होते. त्यांचे विचार व सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.