रिव्हर-वॉकद्वारे नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे अंतरंग समजवले

पुणे (प्रतिनिधी): जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा वाढलेला जोर, अतीवृष्टी व ढगफूटीच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नदीपात्रावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण – काठावर बांधकाम किंवा बराज बांधणे हे पुणे शहरासाठी पूराचा धोका वाढवणे होय. याबाबत शासकीय अहवालात नोंद असूनही पुणे महानगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि “नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या” नावाखाली नदी पात्रामध्ये बांधकाम करत आहे,असे परखड मत वास्तुविशारद आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी मांडले.
निमित्त होते लोकायत आयोजित रिव्हर-वॉकचे हा रिव्हर-वॉक रविवार २३ जुलै रोजी सकाळी ७:३० वा बंड-गार्डन नजिकच्या नदी पात्राला आयोजित करण्यात आला.

उत्तर भारतातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नद्या आणि नदीकाठ विकास प्रकल्प (RFD) हा पुणेकर म्हणून सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केलं असं संयोजक रुषल हिना यांनी सांगितले लोकायतच्या समन्वयिका श्रद्धा म्हणाल्या कि आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व पुणेकरांच्या हितासाठी या प्रकल्पामुळे नक्की काय परिणाम होणार आहेत हे सांगण्यासाठी नदीकाठच्या विविध वस्त्या व सोसायटीमध्ये जनजागृती अभियान राबवणार आहोत.
गेल्या काही वर्षांत देशातील महानगरांमध्ये आलेले पूर व देशाच्या राजधानीमध्ये गेल्या आठवड्यात आलेला पूरही अशाच प्रकारच्या अतिक्रमणाचा परिणाम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणेकर नागरिकांनी शासनावर, राज्यकर्त्यांवर दबाव टाकून हे घातक प्रकल्प थांबवायला हवेत याबद्दल नागरिकांनी एकमत व्यक्त केले. ५० पेक्षा अधिक नागरिक त्यात सहभागी झाले. यावेळी पुणे रिव्हर रिव्हायवलचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
आम्हाला शाश्वत विकास हवा आहे म्हणूनच आम्ही सर्व जण येत्या ९ ऑगस्टला या प्रकल्पाच्या निषेधार्थ पुणे महानगरपालिकेला सकाळी १० वाजता घेराव घालणार आहोत व इतरांनही यात सहभागी करून घेणार असा निर्धार रिव्हर-वॉकचे शेवटी सर्वांनी केला.
× How can I help you?