पुणे :साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” या कादंबरीतील लेखात “जोगणी” या शब्दाच्या ऐवजी “जोगतीण” असा शब्द आलेला आहे, या संदर्भात उपरोक्त लेखाचे लेखक व संपादक यांनी अनावधानाणे झालेली ही चूक मान्य केलेली असून,त्यात सुधारणा करण्यासंदर्भातील आपले लेखी म्हणणे मांडलेले आहे. या संदर्भात दिं १३ जुलै, २०२३ झालेल्या मराठी अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अभ्यासक्रमातील संदर्भ ग्रंथातून “जोगतीण” ऐवजी “जोगणी” असा शब्द वाचावा अशी दुरुस्ती सुचविण्यात आली त्यास मा.विद्यापरिषदेच्या दिं २७ जुलै,२०२३ रोजी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांना त्याप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. असे विद्यापीठाचे लेखीपत्र साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष, अभ्यासक व आंदोलक विनोद अष्टुळ आणि सहआंदोलक राजेश रासगे यांना सहभागी आंदोलकांच्या उपस्थितीत बहाल केले.