पीसीईटी आणि बल्गेरियन सायन्स अकादमी यांच्यामध्ये शैक्षणिक करार
पिंपरी, पुणे (दि. ९ सप्टेंबर २०२३) शैक्षणिक क्षेत्रात देशासह जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि बल्गेरिया देशातील बल्गेरियन अकादमी ऑफ सायन्स, सोफिया या नामांकित संस्था यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक करार करण्यात आला.
या करारामुळे पीसीईटी अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापकांना आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान याबरोबरच संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच पीसीईटी आणि बल्गेरियन सायन्स अकादमी मधील नवीन संशोधन, दोन्ही संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी भेट, परिषद, परिसंवाद, प्राध्यापक यांच्यातील परस्पर हितसंबंध असलेल्या क्षेत्रात संशोधन सहयोगाच्या संधी शोधण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. शैक्षणिक विकास कार्यक्रम, अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, प्राध्यापक आणि या दोन संस्थांमधील विद्यार्थ्यांची गतिशीलता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. पीसीईटीच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि बल्गेरियन अकादमी ऑफ सायन्सच्या संचालक टाटीयाना कौटझारोवा, बल्गेरियन सायंटिफिक कौन्सिलच्या प्रमुख डॉ. कटिया वुतोवा यांनी शैक्षणिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईचे सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर, पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.
पीसीईटी आणि बल्गेरियन सायंटिफिक कौन्सिल यांच्या मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. गिरीश कुलकर्णी, टाटीयाना कौटझारोवा, डॉ. दिनेश अमळनेरकर, डॉ. रोशनी राऊत उपस्थित होते.