पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२३- सततच्या पर्जन्यवाढीमुळे पवना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच पवना धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळीची संभाव्य वाढ लक्षात घेता अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

पवना, आंद्रा तसेच वडीवळे धरण क्षेत्र आणि धरणाच्या पुढील भागात होणारे पर्जन्यमान लक्षात घेता, पवना व इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळपर्यंत अजून पाणी पातळीत वाढ होऊ शकते. याबाबत सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पवना धरण १०० टक्के भरल्याने सकाळी धरणाच्या वीज निर्मिती गृहाद्वारे आणि धरणाच्या सांडव्यावरून एकूण ५ हजार ६०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना पवना धरणाच्या प्रमुखांकडून प्राप्त झाल्या असून धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विदयुत वाहक ठिकाणांच्या संपर्कात येऊ नये तसेच अशा ठिकाणी जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे, असे आवाहन सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.

[democracy id="1"]

marketmystique

× How can I help you?