आळंदी ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भव मोहिमेचे उदघाटन उत्साहात आळंदी ( मल्हार भाऊकाळे) : येथील आणि ग्रामीण रुग्णालयात केंद्र शासनाचे माध्यमातून राबविल्या जात असलेल्या महत्त्वाकांक्षी ” आयुष्मान भव ” या मोहीमेचे उदघाटन आळंदी रुग्णकल्याण समितीचे पदाधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून उत्साहात झाले. हि मोहीम सर्व जिल्ह्यांत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे आळंदी पंचक्रोशीत देखील राबविण्यात येत असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे
यांनी दिली. आळंदी ग्रामीण रुग्णालयात या मोहिमेचे उदघाटन प्रसंगी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य सतीश चोरडिया, पांडुरंग गावडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख उद्योजक राहुल चव्हाण, संकेत वाघमारे, डॉ. शुभांगी नरवाडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन झाले. या प्रसंगी पूणे जिल्हाध्यक्ष कष्टकरी कामगार मल्हार भाऊ काळे आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, हमीद शेख, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, उमेश बिडकर, नसरुद्दीन शेख यांचेसह आळंदी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वृंद, नागरिक, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला दीप प्रज्वलन, राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. आळंदी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी ‘आयुष्मान भव’ या आरोग्य विषयक उपक्रमाची माहिती दिली.
या मोहिमेत देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना आरोग्य सेवा, आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, शून्य ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये प्रभावीपणे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग निदान, उपचार केले जाणार आहेत. याशिवाय नेत्र रोग तपासणी, स्त्री ,पुरुष यांचे विविध आजार यावर तपासणी उपचार, मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या आरोग्य विषयक उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले आहे. आयुष्मान भव आरोग्य विषयक देशव्यापी योजना असून प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्राधान्याने देण्यासाठी मोहीम सुरु करण्यात येत आहे. उपक्रमाचे कालावधीत देशव्यापी आरोग्य सेवा मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत आरोग्य आणि वेलनेस सेंटरवर आयुष्मान शिबीर आयोजित केली जाणार आहेत. लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सर्वानी या आरोग्य तपासणी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जनजागृती, रक्तदान शिबिरे, आणि अवयवदान मोहीम देखील राबविण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमात आळंदी ग्रामीण रुग्णालया तर्फे विविध नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पदी प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख पदी राहुल चव्हाण यांची नियुक्ती झाल्या बद्दल उदघाटन प्रसंगीचे उपक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, संकेत वाघमारे, डॉ. उर्मिला शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना रुख्मिणी मोरे यांनी अवयव दान प्रतिज्ञा दिली. प्रास्ताविक डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार नसरुद्दीन शेख यांनी मानले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या हिंदीतील आयुष्यमान भव उपक्रमाचे चारोळीस उपस्थितांनी मोठी दाद दिली.