भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानीकारक तर ठरत नाहीत ना? याकडे मात्र लक्ष देण्याची वेळ आली आहे.गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले. कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा -हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल. आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. सध्या जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गचक्र बदलत आहे. मान्सून चक्र सुद्धा बदललेली आहे. महापूर, भूस्खलन यासारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक सण हे पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरा करता येईल हे पाहणे सध्याच्या काळामध्ये गरजेचे आहे. गणेशोत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे अपेक्षित आहे. श्री गणराय म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवता. मांगल्यदेवता आणि बुद्धीदेवतेचा हा उत्सव असून या उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव हा जगातील मोठा सामाजिक उत्सव बनला आहे. या गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्यानं तो कटाक्षाने टाळायला हवा. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठय़ा आकाराच्या मूर्तीमुळे विसर्जनाच्यावेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते, त्यामुळे त्याचाही आज गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा -हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला पाहिजे, आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी इनोसन्ट टाईम्स स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री.धनंजय मदने सर यांच्या कल्पनेतून शाळेमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यांनी मातीच्या सहाय्याने जमीनीवर गणपतीच्या मूर्तीचा आकार तयार केला आणि त्यामध्ये त्यांनी हळीव पेरले आणि दहा दिवसाच्या या गणेशोत्सवामध्ये त्या हळिवाचे रूपांतर छान छान रोपांमध्ये झाले आणि हा गणपती हिरव्यागार निसर्गासारखाच हिरवा आणि प्रसन्न दिसू लागला .त्यांची ही जी कल्पना आहे स्तुत्य असून परिसरामध्ये याचे कौतुक करण्यात येत आहे. गणेशोत्सवाचे विसर्जन म्हणून त्यांनी हे खत म्हणून त्यांच्या प्रकल्पामध्ये त्याचा उपयोग केला. आणि अशा पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री.धनंजय मदने सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे तसेच आपल्या निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. या सर्व कामांमध्ये इनोसन्ट टाईम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष अंकिता संघवी मॅडम आणि सर्व शिक्षक गण यांनी मोलाचे सहकार्य केले.