आळंदी (मल्हार भाऊ काळे) : समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरात नेण्यास भागवत वारकरी संमेलन ही उपयुक्त संकल्पना असून हे संमेलन आवश्यक ठिकाणी घेतले गेले. या निमित्त सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन करीत एक आगळं वेगळं अशा प्रकारचं हे संमेलन या ठिकाणी आयोजित केल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान सर्वाना येथे मिळाल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
आळंदी येथे आयोजित भागवत वारकरी महासंघाचे वतीने राज्यस्तरीय वारकरी संमेलनाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन आणि वारकऱ्यांचा सन्मान यावेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दिनकर शास्त्री भुकेले अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, विलास लांडे, प्रकाश म्हस्के, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, तुषार कामठे, विकास लवांडे, शामसुंदर महाराज सोन्नर, सतीश काळे, कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित होते.
खासदार पवार म्हणाले, समाजामध्ये ज्याप्रकारे अस्वस्थता आहे, चुकीची प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूसाची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी, त्याला मानसिक समाधान देण्यासाठी, त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जे काही पर्याय आज समाजासमोर आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा विषय आणि विचार हा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. ते सूत्र घेऊन गेले काही तास आपण या ठिकाणी बसलो. हेच सूत्र घेऊन उभं आयुष्य समाजाचं मन तयार करण्याची कामगिरी करणारे कीर्तनकार असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचं जे योगदान आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. संयोजकांना अंतःकरणापासून धन्यवाद देत आहे.
यावेळी दिनकर शास्त्रींनी वारकरी वैष्णव संप्रदाय पुस्तक लिहिले या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांचे तसेच हस्ते स्त्री वर्गाचा सुवर्णकालीन इतिहास प्रियंका रंजन रामराज चौधरी यांच्या हि पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले सबंध देशामध्ये वेगवेगळी घटक वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावले टाकत आहेत.
पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला आणि धर्म, विचारांच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणताही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचा पुरस्कार कधी करत नाही, चुकीचे संस्कार कधी समाज बांधवांवर करत नाही. योग्य विषय देण्याच्या संबंधीची खबरदारी ते घेतात. या ठिकाणी आधी अनेकांचे विचार आपण ऐकले त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. हा देश अनेक जाती-धर्माचा व भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा असो, अन्य घटकांचा असो त्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका ही प्रकर्षाने मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणं व ते रुजवणं आणि ते शक्तिशाली करणं खऱ्या अर्थाने याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आणि ती आवश्यकता भागवत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण समाजात रुजवू शकतो याची मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सामान्य माणसाच्या हितासाठी जपणूक करणारी जी विचारधारा आहे, समाजाला शक्तिशाली करणारी जी विचारधारा आहे आणि देशाला दुनियेतील कष्टकऱ्यांची आणि न्याय देणाऱ्यांची महासत्ता या भारताला बनवणारी जी विचारधारा आहे ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून युगान युगे मांडली जाते. त्यामुळेच हा देश आणि या देशातील समाज हा आजच्या काळात सुद्धा अनेक संकटे आली, आक्रमणे आली पण त्यावर मात करून मजबूतीने उभा राहिला म्हणून तोच विचार जतन करणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. आणि तेच काम आज या ठिकाणी संमेलनाच्या माध्यमातून विचार देऊन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उजनी धरण उदघाटनाचा प्रसंग सांगितला.
समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत कीर्तनकार,प्रवचनकार यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी शरद पवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतले. आळंदी येथील हजेरी मारुती मंदिराच्या सभा मंडपाच्या दगडी
जीर्णोद्धाराच्या बांधकामाचा प्रारंभ त्यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी आळंदीचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, बबनराव कुऱ्हाडे, रोहिदार तापकीर. सुरेशकाका वडगावकर, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पाटील यांचेसह आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. आळंदीकर ग्रामस्थांचे वतीने चांदीची गदा देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. माऊली मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर आळंदी देवस्थान चे वतीने देखील सत्कार करण्यात आला.