इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमेची आळंदीत घोषणा,
इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी परिक्रमेत समाज प्रबोधन
आळंदी / प्रतिनिधी (मल्हारभाऊ काळे) नामा म्हणे प्रदक्षिणा ! त्याच्या पुण्या नाही गणना !! इंद्र तपश्चर्या ठिकाण व इंद्रायणी नदी उगमस्थान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र तुळापूर पर्यंत इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी समाज प्रबोधन करण्यात येणार आहे. या परिक्रमेचा प्रारंभ १५ डिसेंबर २०२३ रोजी आळंदीतून होत असून सांगता २५ डिसेंबर २०२३ ला हरिनाम गजरात श्रीक्षेत्र आळंदी येथे होणार असल्याची माहिती परिक्रमेचे मुख्य संयोजक ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी दिली.
इंद्रायणी माता पायी दिंडी या परिक्रमेत भाविक, वारकरी, अनेक गावांतील ग्रामस्थ यात सहभागी होणार आहेत. परिक्रमेत इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यास उपाय योजना जनजागृती आणि मुक्कामाचे ठिकाणी कीर्तन महोत्सव, धार्मिक कार्यक्रम होत आहेत.परिक्रमा अतिशय महत्त्वपूर्ण असून अध्यात्मिक दृष्टीने ही महत्त्व आहे. या संदर्भात संतांचे साहित्यात विशेष उल्लेख देखील आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्र येऊनिया भुमिसी ! याग संपादिले अहर्निशी !!
इंद्रायणी इंदोरीशी ! पंचक्रोशी या पासोनि !!
तसेच नवनाथ भक्तिसार या ग्रंथात देखील या बाबत विश्लेषण आहे.
ते मणिकर्णिकेचे जीवन ! आणिले होते कमंडलू भरोन !
परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन ! इंद्रायणी पडियेले !!
असे इंद्रायणी नदीचे प्राचीन काळापासून महत्त्व असून या इंद्रायणी नदीचे तीरावर श्रीक्षेत्र देहू, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र तुळापूर यासह अनेक गावे, वाड्या वस्त्या असून परिसराचे जीवन फुलविले आहे. दरवर्षी इंद्रायणी नदी काठी लाखो भाविकांचे उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा, श्रींचे पालखी प्रस्थान आषाढी व कार्तिकी वारी आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी भाविक इंद्रायणी स्नान व देवदर्शनास येतात. यासाठी परिक्रम महत्त्वाची आहे. यासाठी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व नदीचे पावित्र्य जोपासण्यास गरजेचे आहे. यासाठी इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात इंद्रायणी माता नदी दुतर्फ़ा परिसर दोन्ही उत्तर व दक्षिण तट, उगम ते संगम या भागात ग्रामस्थ, नागरिक, वारकरी यांचेशी सुसंवाद साधून पाहणी करून नियोजन करण्यात आले असल्याचे लाहुडकर महाराज यांनी सांगितले.
यापरिक्रमेचे नियोजने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी ( दि. २ ) श्रीक्षेत्र कुरवंडे येथे या इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमेची घोषणा इंद्रायणी माता उगमस्थान पूजा, आरती, स्वच्छता करून संयोजक ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर यांचे हस्ते झाली. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज पवार, निवृत्ती महाराज कदम,
ह.भ.प. सागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कुरवंडे ग्रामस्थ मार्गदर्शक श्री सुभाष पडवळ प्रमुख उपस्थित होते.
इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रमात सहभागी होणाऱ्या भाविक, वारकरी, नागरिकांची भोजन, निवास आधी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या इंद्रायणी माता पायी दिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रमात सर्वानी सहभाग व्हावे असे आवाहन ह. भ.प. गजानन महाराज लाहुडकर यांनी केले आहे. परिक्रमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष श्री जोग महाराज प्रासादिक दिंडी क्र. ६९ ( श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ) ह.भ.प. सागर महाराज लाहुडकर ( मो. नं.: ८४२१४६१०५४ ),
नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर ( मो. नं.: ७३८५५०५५४१ ) यांचेकडे संपर्क साधण्याचे आवाहन लाहुडकर महाराज यांनी केले आहे.