मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी । आद्यत्रय जननी देवाचिये ॥
आदिशक्ती मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी
मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ । सर्वत्रा वरिष्ठ मुक्ताबाई ॥
आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील सिध्दबेटात विविध सेवाभावी संस्थानचे वतीने श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या जन्मोत्सवा निमित श्रींची पूजा तसेच संत लीलाभूमी असलेल्या सिध्दबेटातील अजानराई मधील अजानवृक्षांची पूजा करून श्री संत मुक्ताईचा प्राकट्य दिन अर्थात जन्मोत्सव धार्मिक मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
चिमुकल्या मुक्ताईला बालपण विसरून ‘आई’ व्हावं लागलं. म्हणून तर आदिशक्ति परखडपणे म्हणतात, चिंता क्रोध मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।आपल्या ज्ञानदादाला मुक्ताई अंतरीच्या उमाळ्यानं समजावते, कळत, नकळत तत्त्वज्ञानाचं बोधामृतही अगदी आईच्या मायेनं पाजते. खरं तर कुणी कुणावर रागावायचं? सारं अंती एकच ! आपलीच जीभ नि आपलेच ओठ ! अल्पकाळ का असेना स्वस्वरूपा पासून दुरावलेल्या ज्ञानदादाला मुक्ताईनं मुक्तपणे विनवलं. सुखसागर आपण व्हावे। जग बोधे तोषवावे।।असं आपल्या अलौकिक सामर्थ्यशाली दादाला विश्वात्मक कल्याणाचं कार्य करायचं आहे ‘तुम्ही तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा।’ असा तिचा लडिवाळ हट्ट तिच्या ज्ञानदादांनी पुरवला. ताटी बरोबर त्यांनी आपल्या मनाचं दारही उघडलं. अवघ्या विश्वाला पुढं ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपानं अत्यंत मौलिक असा अक्षय ‘ज्ञानठेवा’ आदिशक्ति मुक्ताबाईमुळे जगाला ( आपल्याला ) मिळाला. असे अनेक प्रसंग श्रीक्षेत्र आळंदी सिद्धबेट या ठिकाणी घडले. याच सिद्ध बेटांमध्ये ही चारही भावंडं लहानाची मोठी झाली. अशा या संत लीलाभूमीत श्रींचे पदस्पर्शाने पावन झालेल्या सिद्धबेटात श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंचा जन्मोत्सव अजानवृक्षांचे पूजन करून साजरा करण्यात आला.
यावेळी श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर आळंदी शाखा प्रतिनिधी ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, सिद्धबेट ग्राम विकास प्रतिष्ठानचे बाळासाहेब वहिले यांचे हस्ते श्रींची पूजा आणि अजानराईतील अजानवृक्ष पूजा करण्यात आली. या प्रसंगी माऊली दास महाराज, संयोजक नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, संयोजक जोग महाराज प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह. भ. प. विचारसागर महाराज लाहुडकर, सचिन महाराज शिंदे, बाबासाहेब भंडारी,
पूणे जिल्हाध्यक्ष मल्हार काळे, महादेव पाखरे, सुरक्षा कर्मचारी मारुती सोळंखे, ह. भ. प. कृष्ण महाराज कोलते, सारंग महाराज, रवी कुमकर, शशिकांत बाबर, नितीन ननवरे, साईनाथ ताम्हाणे आदींसह वारकरी साधक विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थान माहात्म्य आणि पौराणिक माहिती ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर, मोहन महाराज शिंदे, माऊलीदास महाराज यांनी महत्त्व सांगत उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले.
आळंदी पंचक्रोशीतील सिद्धबेट या तपस्थळाचे संवर्धन होण्याची गरज ओळखून आळंदी नगरपरिषद तसेच विविध सेवाभावी संस्था यांचे माध्यमातून पुरातन साधनास्थळ जतन करून वैभव वाढविण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले आहे. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती तसेच शासकीय स्तरावर आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान चे माध्यमातून पाठपुरावा केला जात असल्याचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. राज्यातील पवित्र्य नद्यांचे पावित्र्य जोपासण्यास समाजाने पुढे येण्याची गरज आहे. नद्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अजानराई सह इतर देशी वृक्ष संवर्धन करण्यास आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे मार्गदर्शनात सिध्दबेटात विकास कामे सुरु झाली आहेत.