सोहळ्याचे प्रारंभ दिनी मंगळवारी ( दि. ५ ) मंदिरात पहाटे घंटानाद, पावमान अभिषेख, पायरी पूजन हैबतबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात होणार आहे. श्री गुरु हैबतबाबा यांचे ओवरीत पूजा, मानकरी यांना नारळ प्रसाद, देवस्थान तर्फे पूजा व महाप्रसाद वाटप होईल. आळंदी कार्तिकी यात्रा निमित्त मंदिराचे महाद्वार लक्षवेधी फुलांनी सजविण्यात येत आहे. यावर्षीही संस्थान तर्फे आळंदी मंदिरावर लक्षवेधी आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर तसेच इंद्रायणी नदी घाटावर देहू आळंदी परिसर विकास समितीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड यांचे माध्यमातून देखील लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देहू परिसर विकास समिती, विश्वास शांती केंद्र आळंदी यांचे तर्फे सहिष्णुतता सप्ताह हरिनाम गजरात सुरु होत आहे. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट चे वतीने दैनंदिन इंद्रायणी महाआरतीचे आयोजन करण्यात येत असल्याचे भोलापुरीजी महाराज यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात यात्रेसाठी भाविकांच्या सेवा सुविधांना प्राधान्य देत नियोजन केले आहे. यात्रा काळात भाविकांचे आरोग्य व सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले असून भाविक, नागरिक यांनीही आपआपल्या आरोग्य सुरक्षिततेसाठी गर्दीचे ठिकाणी तसेच शहरात वावरतांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पंढरपूर येथून श्री नामदेवराय पादुका पालखी सोहळा तसेच श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे अलंकापुरीत आगमन होत आहे. स्वकाम सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष सुनील तापकीर, आशा तापकीर, सुभाष बोराटे आदी मान्यवरांनी आळंदी देहू फाटा येथे सोहळ्याचे स्वागत करणार असल्याचे सांगितले. यावेळी दिंडीतील विणेकरी, पदाधिकारी, दिंडी प्रमुख यांचे स्वागत करण्यात येत आहे.
मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम तसेच श्रींचे दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्याने भाविकांनी या सेवा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे. आळंदी परिसरात यंत्रे निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रवर्तक श्रीगुरू हैबतराव बाबा यांच्या पायरी पूजनाने आळंदी कार्तिकी यात्रेस सुरुवात होत आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. टाळ, विना, मृदंगाच्या गजरात कार्तिकी यात्रेत हरीनामाचा गजर सुरु झाला असून आळंदीत भक्ती रसाचा महापूर आला आहे. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावरील वास्कर महाराज यांच्या मंदिरात संत तुकाराम महाराज यांचे अवतार मल्लप्पा वासकर महाराज यांचे समाधीची पूजा अभिषेक होत आहे.