आळंदीत जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन५ ते ११ डिसेंबर या कालावधीत भाविकांना पर्वणी


आळंदी (मल्हार भाऊ काळे) : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ( दि. ५ ) ते सोमवार ( दि.११ ) या कालावधीत तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्या निमित्त जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी यात्रे निमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यासह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन मंगळवारी ( दि. ५ ) सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे. या सोहळ्याला जगप्रसिध्द संगणकतज्ञ, प्रमुख मार्गदर्शक व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता काळोखे, देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे उपस्थित राहणार आहेत.
रात्री ७.३० ते ९.३० या वेळात संतबुवासाहेब ठाकुरबुवा देठणा, या फडकरी परंपरेतील सहावे वंशज ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव, संत गोरोबाकाका संस्थानचे वाड्मय प्रचारक ह.भ.प. दीपक महाराज खरात, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. संजय नाना धोंगडे, संत साहित्याचे अभ्यासक व सामाजिक सलोखा डॉ. रफीक सय्यद आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे देहूकर यांचे प्रवचन होणार आहे.
या सोहळ्यात सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत तुकाराम महाराज शास्त्री मुंडे, ह.भ.प. कृष्णा महाराज चौरे, शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प.श्री धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंप्रिकर व ह.भ.प. नानामहाराज कदम यांची कीर्तने होणार आहेत.
ह.भ.प. उध्दवबापू शिंदे व सहकारी यांचा अभंगवाणी कार्यक्रम, ओंकार महाराज जगताप यांचा अभंगवाणी, ह.भ.प. गोदावरीताई मुंडे. ह.भ.प. रमेशबुवा सेनगांवकर व सहकारी यांचा अभंग गवळणीचा कार्यक्रम, पं. के.एन. बोळंगे गुरूजी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री. शिवाजी मामा जानवळकर व सहकारी यांच्या गवळणीचा कार्यक्रम, विश्वशांती दिंडीच्या अध्यक्षा ह.भ.प. उषा वि. कराड, एमआयटी हनुमान भजनी मंडळ, विश्वदर्शन भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी भजनी मंडळ यांचा अभंगवाणी कार्यक्रम.
दररोज संध्याकाळी ७.१५ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प श्री अर्जुन महाराज लाड गुरूजी, भागवताचार्य बालयोग ह.भ.प.श्री हरिहर महाराज दिवेगांवकर, रामायणाचार्य ह.भ.प. रामरावमहाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री किसनमहाराज साखरे व वै.बाबामहाराज सातारकर यांचे नातू ह.भ.प. श्री. चिन्मय महाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
रात्रीच्या सत्रात सौ. प्रियंका ढेरंगे चौधरी व सहकारी यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम, विश्वशांती संगीत कला अकादमी, राजबाग येथील शिक्षक व विद्याथी यांचा ‘विश्वाशांती दर्शन’ हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम,ख्यातनाम गायिका अपर्णा संत यांचा सरूप पहाता लोचनी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्री.श्रीधर फडके यांचा ओंकार स्वरूपा हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम व पंडीत शौनक अभिषेकी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल. अशी माहिती श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड आणि प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

× How can I help you?